Saturday, May 12, 2018

"सलाम !सैनिका !!"

दिनांक १० मे २०१८ रोजी शहीद दिनानिमित्त "सलाम! सैनिका!! " हा दृक् श्राव्य कार्यक्रम सायंकाळी ५वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात साजरा झाला.
आपली तिन्ही सेनादलं, बदलत्या काळानुसार अद्यावत तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री कशी हाताळतात, तसेच उत्तम प्रशिक्षण घेतलेले व शारिरीक आणि मानसिकरित्या सक्षम सैनिक प्रत्यक्षात युद्ध भूमीवर सदैव कसे जागरूक असतात. सीमा परिसरात सतत होणाऱ्या छोट्या मोठ्या चकमकी होऊन तिन्ही दलाचे सैनिक कसे धारातीर्थी पडतात.ह्या सैनिकांच्या शौर्यकथा संघाच्या सभासदांनी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट रित्या सादर केल्या. स्लाईड शोद्वारे ही माहिती प्रेक्षकांपर्यंत अचूक रित्या पोहोचवली
आणि त्या सर्व अमर जवानांना मानाचा मुजरा केला.
अत्यंत हृदयस्पर्शी व थरारून टाकणाऱ्या या दृक् श्राव्य कार्यक्रमाला २००हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. त्यात तरूणांची उपस्थिती ही बाब विशेष उल्लेखनीय होती.
९४ वर्षाचे मेजर कारखानीस व त्यांच्या ८६ वर्षाच्या पत्नी यांची उपस्थिती अचंबित करून गेली. सौ. कारखानीस यांनी आपल्या छोट्याशा भाषणाअंती सर्वांसमोर आपल्या पतिला शहीद दिनानिमित्त मानवंदना देऊन कार्यक्रमात चैतन्य आणले.
मेजर कारखानीसांचा नातु श्री आकाश परुळेकर यांनी आधुनिक डिजिटल युगात ड्रोनचा वापर युद्ध भूमीवर कसा होतो,हे प्रात्यक्षिकासहीत दाखविले. तळहातावर मावणाऱ्या ड्रोनचे रिमोट कंट्रोलद्वारे केलेले उडते सादरीकरण उत्कंठा वाढविणारे होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ,समुद्र सपाटीपासून २११४७ फूट उंचीवरील सियाचिन ग्लेशिअर्सच्या बर्फाळ भागात -५३ तापमानात देशाच्या रक्षणार्थ सदैव जागरूक असणाऱ्या तिन्ही दलांवर चित्रित केलेल्या लष्करी वाद्य वृंदाच्या राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.

0 comments:

Post a Comment