११ मार्च १९२३ हा हिंदू पंचागातील गुढीपाडव्याचा दिवस पार्लेकरांच्या जीवनांतील संस्मरणीय दिवस ठरला. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून विख्यात असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निष्ठावान अनुयायाचे लोकमान्याचे नांवाने समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारी आदर्श संस्था स्थापन करण्याचे स्वप्न लोकमान्य सेवा संघ, पारले या संस्थेचा मुहुर्तमेढ रोवून त्यादिवशी साकार झाले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अनमोल आणि नि:स्वार्थी सहयोगाबरोबरच भारतीय समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध आघाडयावर प्रगती घडवून आणणे हे लोकमान्यांना उराशी बाळगलेले स्वप्न होते.

संघाने गेल्या आठ दशकांच्या आपल्या वाटचालीत लोकमान्यांचे समाजोन्नतीचे स्वप्न साकार करण्यादृष्टीने नेत्रदीपक प्रगती केली आहे. सार्वजनिक विश्वस्त संस्था आणि सहकारी संस्था कायद्यांखाली नोंदविण्यात आलेली लोकमान्य सेवा संघ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे. केवळ ३० ते ४० सभासदांच्या पाठबळावर आपल्या कार्याचा श्रीगणेशा करणा-या संघाचे आज ३,००० पेक्षा जास्त सभासद आहेत.